छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
मनपाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने शहरात अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. शहरात कुठे अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जात आहे, तर कुठे मुख्य रस्त्यांवरील फूटपाथ मोकळे केले जात आहेत. याच कारवाईचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी सुतगिरणी चौकात पाहायला मिळाला. मनपाचे अतिक्रमणविरोधी पथक अचानक चौकात दाखल होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि व्यापाऱ्यांची पळापळ झाली.
सायंकाळच्या गर्दीच्या वेळी मनपाचे वाहन चौकात येताच कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि दुकानाबाहेरील साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली. स्प्रिंग पोटॅटो फ्राईज, मोमोजच्या गाड्यांसह दुकानांसमोर बेकायदेशीरपणे ठेवलेले फ्रीझरही जप्त करून मनपाच्या वाहनात भरण्यात आले. कारवाई इतकी अचानक झाली की, सुरुवातीला ग्राहक आणि नागरिकांना काय चालले आहे हेच समजले नाही. अनेक दुकानदारांनी आपला माल वाचवण्यासाठी धावपळ केली, मात्र मनपा कर्मचाऱ्यांनी कोणालाही सवलत दिली नाही.
लहान व्यापाऱ्यांचा संतापः
"आम्ही कसेबसे आमचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, महापालिकेने आमची हातगाडीजी
आमच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होतीतीच उचलून नेली. काही लोकांना दंड घेऊन सोडण्यात आले, पण आमचे म्हणणे कोणी ऐकले नाही. दुर्बल आणि गरिबांप्रती महापालिकेची ही वागणूक भेदभावपूर्ण आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमोल कुबेर या दुकानदाराने दिली.
या अचानक केलेल्या कारवाईमुळे सुतगिरणी चौकात काही काळ वाहतुकीचा खोळंबा आणि मोठी गर्दी झाली होती. महापालिकेने शहराला शिस्त लावण्यासाठी ही मोहीम अशीच तीव्र ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















